देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही ? : कोळसे पाटील

12

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी
याने पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केले. यावरून भाजपनं पुण्यातील स्वारगेट पोलिसांत सोमवारी तक्रार दाखल केली. त्यानंतर आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल कोळसे-पाटील यांनी विचारलाय.

फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून स्वत:चं मुख्यमंत्रीपद पणाला लावलं, असा स्पष्ट आरोप कोळसे-पाटील यांनी केला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारेही हिंदूच आहेत. आमच्यार गुन्हे दाखल करायचे असतील तर करावेत. आमची भाषणं तपासावीत, आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, असा दावाही कोळसे पाटील यांनी केला आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषेदत शरजील उस्मानी यांने हिंदू समाज पूर्णत: सडका बनला आहे, असं विधान केलं होतं. शरजीलच्या या वक्तव्यावरुन भाजपनं आक्रमक पवित्रा घेत, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. शरजीलच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागतो असे कोळसे पाटील म्हणाले.

शरजीलने हिंदू ऐवजी मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता. असे कोळसे पाटील म्हणाले. मात्र, मी त्याचा निषेध करणार नाही आणि त्याच्या वक्तव्याचं समर्थनही करणार नाही, असं कोळसे-पाटील म्हणाले आहे.