राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा; मंत्र्यांकडून रक्तदान करण्याचं आवाहन

11

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा भासत आहे. राज्यात सध्या केवळ ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे.

त्यामुळे सर्व ब्लड बँक्स, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन आपापल्या विभागात रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे आणि राज्यातील रक्तसाठा वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

राज्यात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याची गंभीर परिस्थिती ओढवली आहे. रक्तसाठा कमी झाल्याने रक्ताची गरज वाढत आहे. महाराष्ट्रात केवळ ५ ते ६ दिवस पुरेल इतका रक्तसाठा उरला आहे.

आज कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून खासकरुन तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कुणीतरी रक्ताशिवाय तडफडून मरतोय, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. कुणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपलं रक्त उपयुक्त ठरेल, ही भावना मनात ठेवून रक्तदान करा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.