अॅड प्रकाश साळसिंगीकर, 98920 10121
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं…!
आठवतं ना तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने भरली होती लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं प्रेमानेच अलगद वर काढलं असतं तुम्हाला ते कळलं होतं मलासुध्दा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. ही मंगेश पाडगावकर यांची कविता कधीच आउटडेटेड होईल असे वाटते आहे कारण यातील प्रत्येक क ड व प्रत्येक कडव्यातील प्रत्येक ओळी मध्ये मोठा अर्थ दडलेला आहे. प्रेमासाठी वाटेल ते, प्यार किया तो डरना क्या, एवरीथिंग फेअर इन लव अँड वार.
अशा प्रकारे प्रत्येक प्रेम करणारा बिंदास जगत असतो व प्रेमासाठी आज केलेल्या कृती मुळे उद्या काय परिणाम होतील याचा शक्यतो विचार करत नाही. पण अनेकदा असे अविचाराने वागणे त्या व्यक्तीला किंवा तिच्या जवळच्या व्यक्तीला मोठ्या संकटात ढकलू शकते. एका केसमध्ये त्याच्या घरी अचानक त्याचा मित्र येतो सोबत मित्राची प्रेयसी असते व काही तास आम्ही येथे राहून निघून जाऊ अशी विनंती केल्यामुळे तो त्यांना तेथे राहू देतो. परंतु सदर मुलगी जी अठरा वर्षाच्या उंबरठ्यावर होती म्हणून तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार केली होती. त्या दोघांचे प्रेम प्रकरण असल्यामुळे ते आपापल्या घरी न सांगता पळून लग्न करणार होते.
मुलगी अज्ञान असल्यामुळे पक्ष कायद्याअंतर्गत केस दाखल करण्यात आली व या कायद्याअंतर्गत घडलेल्या गुन्ह्याची माहिती न दिल्यामुळे ज्याने मित्राला आसरा दिला होता त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या एका केसमध्ये सोळा वर्षाची मुलगी व 21 वर्षाच्या मुलाचे प्रेम प्रकरण होते ते घरच्यांना न सांगता अज्ञात ठिकाणी निघून गेले व दोन वर्षांनी मुलगी 18 वर्षाची झाल्यावर ते आपापल्या घरी भेटायला गेले सोबत त्यांचे सहा महिन्याचे मूल होते. ज्यावेळी पोलिसांना याबाबत कळाले त्यावेळी पोलिसांना त्या मुलाला अटक करावी लागली कारण ज्या वेळी मुलगी घरातून त्याच्यासोबत निघून गेली होती त्याच वेळी घरच्यांनी कायदेशीर रखवालीतून बालकाला पळून देण्याची व पॉक्सो ची केस दाखल केली होती व त्यांचे सहा महिन्याचे बाळ असल्यामुळे त्याचा डी एन ए रिपोर्ट हा आरोपी विरोधातील महत्त्वाचा पुरावा होता. त्यामुळे त्याची पत्नी त्याला अटकेपासून वाचवू शकली नाही. तिसऱ्या एका केसमध्ये त्या दोघांच्या प्रेमास तिच्या घरच्यांची संमती नव्हती ज्यावेळी तीने त्याच्या सोबत पळून लग्न केले, त्यावेळी तिच्या वडिलांनी त्याच्या विरोधात केस दाखल केली व पोलिसांनी त्याला अटक करून तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पण नवर्याला जेलमध्ये पाठवले त्याचा राग तिच्या मनात होता तिने 164 (दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला ) च्या जबाबात असे खोटे सांगितले की तिच्या वडिलांनी सुद्धा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे नवऱ्यासोबत वडिलांना सुद्धा पोलिसांनी अटक केली.
अशा अनेक प्रकारच्या केसेस घडत असतात अशा केसेस मधून वेळोवेळी एक बाब लक्षात येते की ज्या नाजुक वया मध्ये ही मुले असतात त्या वयामध्ये त्यांना योग्य अशी माहिती योग्य व्यक्तीकडून न मिळाल्यामुळे, स्वतःचे मन योग्य व्यक्तीकडे मन मोकळे न झाल्यामुळे, जवळच्यांसोबत संवाद नसल्यामुळे स्वतःचे निर्णय ते स्वतः घेऊ लागतात किंवा अशा एखाद्या व्यक्तीचा आधार घेतात की जी व्यक्ती योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकेलच अशी नसते परिणामी अनेकदा निर्णय चुकीचा निघण्याची शक्यता असते.
अनेक केसेस मध्ये स्वतःची कुठलीही चूक नसताना फक्त वाईट संगतीच्या मुळे सोबत असलेल्या व्यक्तीच्या कृतीमुळे आयुष्य खराब झाल्याचे दिसले आहे. सहाजिकच कोणतीही व्यक्ती प्रेम करताना वय बघत नसली तरी पालकांची जबाबदारी आहे की ते बघूनच करावे असे आपण आपल्या मुलांना सांगितले पाहिजे कारण कुठलीही गोष्ट योग्य वेळी होणेच कधीही हिताचे असते, सोबतच अशा केसेसमध्ये माणूस अडकत नाही. काहीतरी वेगळे करून दाखवावे च्या नादात बऱ्याचदा मुले मोठ्या चुका करीत असतात आज-काल इंटरनेटच्या युगात जेथे एका क्लिकवर अनेक हव्या आणि नको अशा गोष्टी सुद्धा मिळतात अशा युगात आपले खाजगी क्षण व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड करणे किंवा त्याचे फोटो काढणे हे नक्कीच टाळले पाहिजे कारण ज्यावेळी नको त्या व्यक्तीच्या हातात असे व्हिडिओ किंवा फोटोग्राफ्स जातील त्या वेळी त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.
अनेकदा प्रेम प्रकरणांमध्ये ब्रेकप सुद्धा होत असते अशावेळी खाजगी क्षण आतील फोटो व व्हिडीओ यांचा वापर करून ब्लॅकमेल केल्याची उदाहरणे आहेत. अशा स्थितीमध्ये त्या मुलाने किंवा मुलीने त्वरित आपल्या आई किंवा वडिलांना विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली तर भविष्यात मोठ्या संकटात सापडण्यापासून ते वाचू शकतात. अशी एखादी बाब मुलांकडून आई-वडिलांना कळाली तर त्यांनी सुद्धा मुलांना रागवण्या व मारण्याचे ऐवजी त्यांना विश्वासात घेऊन धीर देणे गरजेचे असते. मुलांशी कसा संवाद असला पाहिजे कि त्यांनी कितीही काहीही केले तरी त्यांचे आई-बाबा त्यांना पदरात घेतील व त्यांना सर्व समस्यांमधून बाहेर काढतील असा विश्वास त्यांना निर्माण झाला पाहिजे.
आपला मुलगा किंवा मुलगी हे नेमके काय करतात याकडे लक्ष ठेवतानाच त्यांना पुरेशी मोकळीक देणे गरजेचे आहे. एखादी अनपेक्षित घटना घडल्यावर कितीही उपायोजना करून उपयोग नसतो त्यामुळे अशी घटना घडू नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे व असे प्रयत्न करताना वरील कवितेतील लक्षात ठेवली पाहिजे की तुमचे आमचे सेम असते व त्या भूमिकेतून विचार केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आनंदी व्हॅलेंटाईन डे सर्व जण साजरा करू शकतील.
लेखक विशेष सरकारी वकील आहेत.