कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले आहे. आज पहाटे अडीच वाजता पूजेला सुरुवात झाल्यानंतर ३.३० वाजण्याच्या सुमारास विठ्ठलाच्या लाईव्ह दर्शनासह महापूजेचा सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे. असे पवारांनी सांगितले.
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयर, सौ कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते. तसेच समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते.