महादेव जाणकरांनी घेतली पवारांची गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

10

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने भाजपला मोठा धक्का दिला आहे. या धक्क्यातून भाजप अद्यापही सावरत नाही तोच आता एका मित्र पक्षाने पुन्हा धक्का दिला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुप्त भेट घेतली आहे.

धनगर समाजाचे प्रमुख नेते असलेले महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. जानकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. महादेव जानकर यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली आहे. पुण्याजवळील व्हिएसआय इनस्टिट्युटमध्ये महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याने जानकर यांनी पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीने भाजप मित्र पक्ष गमावू शकतो तर महाविकास आघाडीला बळ मिळेल अशी चर्चा गाजली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 3 डिसेंबरला ही भेट झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली आहे. नुकतेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर बीडमध्ये भाजपचे माजी खासदार आणि राज्यमंत्री जयसिंग गायकवाड यांनी जाहीरपणे भाजपवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार आहे. या सरकारची जवळीक साधण्यासाठी पवार यांची भेट घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही नेत्यांची कधीही भेट झालेली नव्हती.