जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही, घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी श्री. ठाकरे बोलत होते. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जनतेच्या आशीर्वादामुळे तीन पक्षांचे सरकार वर्षभरापूर्वी अस्तित्वात आले. वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठिशी ठामपणे हे सरकार उभे आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य शासनाने लपवाछपवी केलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.