चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख (वय 21) हे श्रीनगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले असल्याची माहिती समोर येत आहे. जवान यश देशमुख हे पावणे दोन वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते. यश गेल्यावर्षी बेळगाव येथे प्यारा मिलेट्रिमध्ये भरती झाले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मराठा बटालियन तुकडीत त्यांचा समावेश झाला होता. काल दुपारी कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले.
यश यांना आधीपासून सैन्य दलाबद्दल आकर्षक होते. त्यासाठी भरपूर मेहनत करून ते भरती झाले होते. यश सप्टेंबरमध्ये गावी येऊन गेले होते, त्यांची घरच्यांशी ही शेवटची भेट ठरली. त्यांचे वडील शेती करतात. त्यांना एक भाऊ व विवाहित बहीण आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने गावचे लोक देखील आक्रोश करत आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्या आई-वडिलांना ही गोष्ट अजूनही माहीती नाही. गावात एकही चूल पेटली नसून दहशतवादयांच्या भ्याड हल्ल्यांचा सर्वत्र निषेध होत आहे.
यश देशमुख शहीद झाल्याचं वृत्त सैन्य दलाच्या वतीने यशाच्या घरच्यांना देण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून या घटनेला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. शहीद यश दिगंबर देशमुख यांचं पार्थिव शवविच्छेदनानंतर श्रीनगहून चंदीगड आणि औरंगाबाद मार्गे चाळीसगावला येणार असल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे. त्यांचे पार्थिव 28 च्या रात्री किंवा 29 दुपारपर्यंत येणार असल्याची माहिती आहे.