विवेकवादाची चळवळ जनमानसात रूजविणा-या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये हुकुमशाही प्रवृत्तीचा शिरकाव झाल्यामुळे समितीमध्ये फूट पडल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूला डॉ. नरेंद्र दाभोलकर कुटुंबीय आणि त्यांचे समर्थक तर दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्ष अविनाश पाटील असे दोन गट पडले आहेत. कार्याध्यक्षांचा एककल्ली कारभार आणि अहंम वृत्ती याबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे भविष्यात दोन संघटना कार्यरत होणार असल्याचे संकेत देण्यात येत आहेत.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून समितीच्या कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू होती. अविनाश पाटील यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर समितीचा कारभार कसा असावा आणि त्याचे आर्थिक नियोजन कसे असावे यावरूनच मतभेदाला सुरूवात झाली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनीही समितीमधील या अंतर्गत वादाबाबत ‘लोकमत’ शी बोलताना दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, संघटनात्मक काम म्हटलं की मतभिन्नता असणारचं. हेच लोकशाहीचे लक्षण आहे. पण विवेकवादी मार्गातून सर्वांच्या मताच्या आदर राखणे हेच विचार डॉ, नरेंद्र दाभोलकर यांनी कार्यकर्त्यांमध्ये रूजवले होते. मात्र कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची कार्यपद्धती अशी होती की कुणी विरोधी मत व्यक्त केलं तर त्याला बाहेर काढणं. एकप्रकारे त्यांचा एककल्ली कारभार सुरू होता.
माध्यमांमध्ये दाभोलकर कुटुंबीय सातत्याने प्रकाशझोतात येते हे पाटील यांना खपत नव्हते. मला महत्व न देता त्यांना दिलं जातंय. यातून त्यांच्यात अहंकार सातत्याने डोकावत होता. अविनाश पाटील यांनी कितीतरी गोष्टी आमच्या मनाविरूद्ध केल्या. पण आम्ही काही बोललो नाही. सगळं आपल्या हातात असलं पाहिजे असे त्यांना वाटत आहे.