कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोनाविरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ज्ञ डॉक्टर्स यांना केले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकित खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ज्ञांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवस रात्र रुग्णसेवा करीत आहात.
मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली आणि कोरोनाने आक्राळविक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला आहे. त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे, असे त्यांनी सांगितले.