प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचा ‘हा’ चित्ररथ करणार पथसंचलन

11

महाराष्ट्राच्या वतीने ‘वारकरी  संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.

महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 15 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 32 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबौ मरिनमई यांनी काल कँटॉन्मेंट परिसरातील राष्ट्रीय रंगशाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत नामदेव, संत शेख महंमद, संत नरहरी, संत सावता, संत दामाजीपंत, संत गोरोबा, संत एकनाथ, संत सेना, संत चोखामेळा यांच्या मूर्ती  उभारण्यात आल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी राजपथावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने चित्ररथाच्या संकल्पनेपासून ते चित्ररथ बांधणी व कलाकारांच्या सरावासह प्रत्यक्ष चित्ररथ संचलनाचे कार्य पार पडते.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या वारकरी संतांची थोर परंपरा दर्शविणारा चित्ररथ सादर करण्याचा निर्णय झाला आणि विभागाने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत सुंदर व सुबक चित्ररथ तयार केल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक ‍बिभीषण चवरे यांनी बोलताना सांगितले.