महाविकासआघाडी सरकारच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होते आहे. संजय राठोडांचे प्रकरण संपत नाही तो मनसुख हिरेन प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधारी महविकासआघाडीला घेरण्यास सुरुवात केली. आता याप्रकरणामध्ये परमवीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करुन महाविकासआघासमोर संकटाचा डोंगरच ऊभा केला. परमवीर सिंह यांच्या या कृतीमुळे मात्र भाजपच्या गोटात आनंद आहे. अगोदर वनमंत्री होते, आता थेट गृहमंत्री रडारवर आहे. साहजिकच भाजपने यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमधील ही दुसरी विकेट पडणार अशा शक्यतांना राजकीय वर्तुळात ऊधान आले आहे.
संजय राठोड यांना राजिनामा द्यायला भाग पाडून भाजपने विदर्भात शिवसेनेला सुरुंग लावला. आता भाजपचा मोर्चा राष्ट्रवादीकडे आहे. अनिल देशमुख यांनी राजिनामा द्यावा याकरता राज्यभरात भाजपच्यावतीने तीव्र निदर्शने केली जात आहे. भाजपला साथ देण्यासाठी मनसेसुद्धा मैदानात ऊतरली आहे. परिणामी शरद पवार यांनी दिल्लीला तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीतून मोठी बातमी समोर येण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत अनिल देशमुख यांना राजिनामा द्यावाच लागणार अशीच परिस्थिती आहे. महाविकासआघाडी सरकारच्या जडणघडणीत महत्वाचा भाग असणारे शिवसेना खा. संजय राऊत यांनीसुद्धा प्रकरण हताबाहेर जात असल्याचे संकेत दिले आहेत. परंतू अनिल देशमुख यांचा राजिनामा झाल्यास महाविकासआघाडी सरकारसाठी हे फार नुकसानदायी ठरेल.
एकीकडे गृहमंत्रीपदावरुन चढाअोढ होणार आणि दुसरीकडे आरोप मान्य केलेत असा संदेश समाजात जाऊन प्रतिष्ठेची मानहानी होणार. महाविकासआघाडी सरकारला सामान्य माणसाच्या मनात कसे बदनाम करता येईल याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. त्यामुळे भाजप राजिनामा घेतल्याशिवाय शांत बसणार आहे.
अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यास अॉपरेशन लोटसमध्ये भाजप कासवाच्या गतीने का होईना यशस्वी होतेय हे सिद्ध होईल. परंतू महाविकासआघाडी सरकारचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील चाणाक्य समजले जाणारे शरद पवार यांच्याकडे भाजपच्या या बॉलला टोलवण्याची क्षमता आहे. कारण विकेट सोडल्यास होणार्या नुकसानाची त्यांना जाणिव आहे. रणनितीशिवाय खेळणार्यांपैकी शरद पवार नाहीत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये शरद पवार काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.