काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून ममता सरकार अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यावरून १५ डिसेंबरपर्यंत ममता सरकार पडणार असल्याचा दावा भाजपाचे खासदार सौमित्र खान यांनी केला आहे.
सौमित्र खान यांनी काल ममता सरकार अस्थिर असल्याचा दावा केला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून राज्यात फोडाफोडीचे आणि पक्षांतराच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. गेल्या १० वर्ष राज्यात सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला ग्रहण लागले आहे .तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार आमच्या संपर्कात आहेत. असा दावा ही खासदार सौमित्र खान यांनी केला आहे.राज्यपाल जगदीश धनखड हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्याच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देऊ शकतात. असा दावाही काल एका कार्यक्रमात बोलताना सौमित्र खान यांनी केला होता.
शुभेंदू अधिकारी हे आत्ता तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे . भाजपने तृणमूल काँग्रेसचे ६२ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर आत्ता उलट भाजपचेच तीन ,चार आमदार तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा तृणमूल कॉंग्रेसने केला आहे. शुभेंदू अधिकारी हे मिदणापूरमधील बलाढय नेते आहेत. अद्यापही तृणमूल काँग्रेसने केलेल्या दाव्यावर भाजपकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही.