पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेल्या दंगलीत तृणमूल आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्यात काहींना आपला प्राणही गमवावा लागला होता. या सर्व घडामोडीत निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या चांगल्याच रंगल्या होत्या. या सर्व घडामोडीवर भाजपा अध्यक्ष जी. पी नड्डा हे एक दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले होते.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर एवढा हिंसाचार झाला आहे, की त्याची तुलना फाळणीच्या वेळी झालेल्या भयानक हिंसाचाराशीच करता येईल, असे सांगत थेट नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच ममता बॅनर्जींचे दुसरे नाव “असहिष्णूता” असल्याचे टीकास्त्र जे. पी नड्डा यांनी सोडले होते. दौऱ्या दरम्यान पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली होती.
नड्डा यांनी दक्षिण २४ परगणा, कोलकाता या जिल्ह्यातून दौऱ्याची सुरूवात केली. त्यांनी भाजपचे कार्यकर्ते अभिजीत सरकार शेफाली दास, हरन अधिकारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. तृणमूळच्या गुंडांच्या हिंसाचारात अभिजीत सरकार आणि हरन अधिकारी यांना प्राण गमवावे लागले आहेत. अभिजीत सरकार यांच्या वृध्द आईचे आणि हरन अधिकारी यांच्या पत्नी आणि मुलांचे अश्रू कोण पुसणार, असा खडा सवाल नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांना केला.