प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणार्‍या “त्या” व्यक्तीस दिल्ली पोलिसांकडून अटक!

10

प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे शेतकर्‍यांच्यावतीने काढण्यात आलेल्या टॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले होते. दरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी लाल किल्ल्यावर घुसून धुडगुस केला होता. त्यापैकी एकाने लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला होता. हा व्हिडिअो संपूर्ण देशभर व्हायरल झाला आणि देशभरातून यावरव संतप्त प्रतिक्रिया ऊमटत होत्या. दीप सिद्धू नामक व्यक्तीने हा प्रकार केला असल्याचे समोर आले होते. यानंतर दीप सिद्धू फरार झाला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत त्यास अटक केली आहे.

प्रजासत्ताकदिनाच्यादिवशी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान नियोजित मार्गावरुन दुसर्‍या मार्गावर नेण्याचा आणि शेतकर्‍यांना चिथावण्याचा आरोप दीप सिद्धूवर आहे. लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रकारानंतर दीप सिद्धू फरार होता. दीप सीद्धूला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक स्पेशल पथक पंजाबसाठी रवाना केले होते. सिद्धूवर दिल्ली पोलिसांनी एक लाखाच बक्षिससुद्धा जाहीत केलं होतं. अखेर पोलिसांनी सिद्धूस पकडले आहे.

दीप सिद्धू हा पंजाबी गायक आहे. ‘रमता जोगी’ २०१५ मध्ये त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘जोरा दास नंबरिया’ हा त्याचा चित्रपट २०१८ मध्ये आला होता. शेतकरी आंदोलनात दीप सिद्धू सक्रीय होता. ट्रॅक्टर रॅलीच्यावेळी दीप सिद्धूने मार्ग बदलून लाल किल्ल्यावर चढून झेंडा लावला होता. यावरुन शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले होते. काहींनी हा देशाचा अपमान असल्याचे म्हटले होते. शेतकर्‍यांनी त्याला या कृतीबद्दल विचारले असता तो काहीही न बोलता फरार झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्याच्यावर भाजपचा हस्तक असल्याचे आरोप केले होते. दरम्यान दीप सिद्धूचे भाजपचे खासदार सनी देअोल आणि इतरही नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. शेतकर्‍यांकडूनसुद्धा सिद्धूस अटक करण्याची मागणी होत होती.

प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचारात ३०० हून अधिक पोलिस गंभीत जखमी झाले होते. याप्रकरणात आत्तापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी, याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हरप्रीत सिंह (३२ वर्ष), हरजीत सिंह (४८ वर्ष), धर्मेंद्र सिंह (५५ वर्ष) या लोकांनाही अटक केलीय. सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेजद्वारे पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

दीप सिद्धू याने फरार झाल्यानंतर एका जवळच्या मित्राच्या सहाय्याने व्हिडिअो पोस्ट केले होते. ज्यामध्ये तो निर्दोष असल्याचे सांगत होता. आता दीप सिद्धूस अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरु असल्याचे दिल्ली पोलीसांनी सांगीतले आहे.