काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना शिवसेनेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या भूमिकेवर मी काय सांगू शकतो. महाविकास आघाडी मजबूत व्हावी असं मला वाटतं. कालांतराने भूमिका बदलतात. अनुभवाने माणूस शिकतो. शिवसेनाचा हा बदल स्वागतार्ह आहे”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली
औरंगाबाद शहराच्या नामकरणावरुन राजकारण तापलं आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.“औरंगाबाद नामकरण हा विषय माध्यमांनी उचललेला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही बोलले आहेत का? सरकारमधून कुणी काही निर्णय घेतले का? माध्यमांनी अजेंडा सेट करायचा त्यावर प्रतिक्रिया घ्यायच्या,अजूनही हा विषय नाही. आम्हाला राज्यातील विकास कामांबाबत जास्त रस आहे. जिल्हास्तरावर कुणी काही बोलत असतील तर तो विषय जिल्हास्तरावरचा आहे. राज्य स्तरावर हा विषय नाही”,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने दिलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला.“राज्याच्या सगळ्या गोष्टी ईडी, सीबीआयकडे जात असतील तर राज्याला स्वायत्तता आहे की नाही? राज्यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप किती असावा? राजकीय हेतूने या गोष्टी घडत आहेत. राज्याचे विषय रोज सीबीआय आणि ईडी होणार असेल तर हे योग्य नाही. भाजप सोडून सगळ्यांच्याच पक्षांना नोटीस येत आहेत”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती भाषिक नागरिकांना आकर्षित करण्यासाठी गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला आहे. येत्या 10 तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे.