भाजपमधील अनेक नेते काँग्रेसच्या वाटेवर – बाळासाहेब थोरात

11

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्य़ातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपमधील आणखी काही नेते काँग्रेसच्या वाटेवर आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य व अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे, बुवासाहेब नवले, रमेश जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मदन पथवे, सावरगावपाठचे सरपंच रमेश पवार, समशेरफट गावचे सरपंच भास्करराव दराडे, देवगण गावचे एकनाथ सहाणे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

भाजपमधून अनेक नेते काँग्रेसमध्ये येणार आहेत. लवकरच मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार असल्याचे संकेतही त्यांनी आपल्या भाषणात दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपचे अनेक नेते काँग्रेसची वाट धरतील असा अंदाज वर्तवला जात आहे.