शुक्रवारी रात्री एक खळबळजनक दावा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला आहे.शुक्रवारी रात्री ट्विटरवरुन टिकैत यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक भाजप नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.
शनिवारी सकाळीही टिकैत यांनी एक ट्विट केले असून दिल्लीच्या सीमांवर पुन्हा जमा होण्यासाठी मोठ्याप्रमाणात शेतकरी निघाले असल्याचे म्हटले आहे. गावांमधून आज सकाळपासूनच ट्रॅक्टर निघण्यास सुरुवात झाली आहे. गाझीपूर सीमेवर आज कालपेक्षा अधिक शेतकरी पोहचणार असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे.
अनेक भाजप नेत्यांचे मला आज फोन आले. आम्ही सुद्धा राजीनामा देत असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. पक्षात राहून अशाप्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा अपमान पाहू शकत नाही. आम्ही अजूनही गप्प राहिलो तर येणारी पिढी आम्हाला कधीच माफ करणार नसल्याचे हे नेते म्हणाल्याचे ट्विट टिकैत यांनी केले आहे.
मुझफ्फरनगर येथे ‘महापंचायत’ घेऊन आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी घेतला. छोटय़ा-छोटय़ा गटांमध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीकडे रवाना होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
२६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसेनंतर शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर शेतकरी आंदोलनातील दोन प्रमुख संघटनांनी माघात घेत आंदोलनातून बाजूला होत असल्याचे जाहीर केले.
टिकैत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.