पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असणारा उजनी प्रकल्प हिरवागार प्रदेश, प्रेक्षणीय प्राचीन स्थळे, हिवाळ्यात पक्ष्यांचा वावर यामुळं उजनी परिसरात कृषी पर्यटनाच्या अनेक संधी खुणावत असून कृषी पर्यटनाच विचार अमलात आणल्यास तो प्रयोग देखील यशस्वी ठरू शकतो.
पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या उजनी धरणाचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाय भीमा नदीवरील उजनी धरणामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतीचा विकास झाला.
अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतीला मुकावे लागले. मात्र, जिद्दी शेतकऱ्यांनी खचून न जाता जिद्द बाळगत पाण्याच्या जोरावर आपला विकास साधला आहे. इथल्या शेतकऱ्यांनी गेल्या 30 वर्षांत घेतलेल्या मेहनतीचे चीज आता दिसू लागले असून सध्या उसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पट्ट्यात केळी, पेरू आणि डाळिंबाच्या बागा वाढताना दिसत आहेत.
इंदापूर आणि करमाळा तालुक्यात उजनी लाभक्षेत्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यात पळसनाथचे हेमाडपंथी मंदिर(पळसदेव), पक्षी निरीक्षण पॉइंट (कुभारगाव्) जुने नाथाचे आणि हनुमानाचे मंदिर (भिगवण), ब्रिटिशकालीन पुल आणि ब्रिटिशकालीन लिफ्ट (डिकसळ), प्राचीन शिल्प आणि अवशेष आणि ब्रिटिशकालीन रेल्वे पूल (सोगाव), इनामदार वाडा (कुगाव), कोटलींग मंदिर (चिखलठाण) या सारखी प्राचीन स्थळे आहेत.