पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मार्ग मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अडवण्याचा एल्गार करण्यात आला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोके मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली.
“मराठा समाजाला ना राज्याच्या सुविधा मिळत आहेत, ना केंद्राच्या. मराठा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय कधीपर्यंत सहन करणार? शासकीय सेवेत आणि शिक्षणात मराठा समाजाला डावलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या व्यथा समजून घ्याव्यात, मराठा समाजाचा आढावा घ्यावा, म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुण्यात मोदींचा मार्ग अडवून भेट घेणार आहोत” असे आबासाहेब पाटील यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयानं एसईबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली असून, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या कार्यवाहीबाबत महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला कायदेशीर अभिप्राय विचारात घेतल्यानंतर सर्व प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ही ठाकरे सरकारनं स्पष्ट केले आहे.