राज्यातील मराठा समाजाची आग्रही मागणी असलेलं मराठा आरक्षण रद्द झालं. त्यानंतर मराठा समाजातील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे राज्यशासन अडचणीत आले होते. त्यावर अनेक राजकीय नेत्यांनी टीका टिप्पणी केली.
आता याच मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा खणखणीत सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
फडणवीस मीडियाशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर भाष्य केलं. केंद्राने राज्याचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. राज्याने पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी. केंद्र सरकार करू शकत नाही. सर्वच केंद्राने करायचं तर राज्यांनी माशा मारायच्या का? असा प्रश्न फडणवीसांनी केला आहे.
102व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने तात्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभारीच आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.