महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठा आरक्षण प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले, भाजप सरकारने दिलेल्या विधितज्ञांच्या जोडीने विद्यमान सरकारनेही नामवंत व अभ्यासू वकील दिले होते.
अपेक्षित सर्व दाखले, कागदपत्रे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, असे असतांनाही सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निकाल अनपेक्षित आणि निराश करणारा आहे. असं थोरात म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी एकत्रितपणे आजवर मराठा आरक्षणाचा लढा लढला आहे. यापुढेही ही लढाई आपल्याला एकत्र येऊनच लढायची आहे, विरोधी पक्षांना माझे आवाहन आहे, आपण चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करू नये. असे कळकळीचे आवाहन थोरात यांनी केले.
मराठा समाजाने ज्या संयम आणि धीराने आजवर हा लढा दिला आहे, तोच संयम या पुढेही दाखवा. लोकशाही मार्गाने आपण आपले न्याय हक्क नक्की मिळवू. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून पुढील योग्य दिशा ठरवेल. मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न आम्ही करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.