तमिळसोबतच हिंदी चित्रपटांतूनही रजनीकांत यांनी अफाट लोकप्रियता मिळवली. त्यांचा जन्म १२ डिसेंबर, १९५० या दिवशी बंगळूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. अस्सल मराठमोळे शिवाजीराव गायकवाड अर्थातच रजनीकांत. सुपरस्टार रजनीकांत हे शनिवारी (ता. १२) ७० वर्षांचे होणार आहेत. तमिळनाडूच्या राजकारणात उतरण्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली असल्याने आनंदित झालेले त्यांचे चाहते आज त्यांचा वाढदिवस भव्य पद्धतीने साजरा करणार आहेत.
रजनीकांत यांच्या ‘रजनी मक्कल मद्रम’ या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात अन्नदान, रक्तदान शिबिर, गरजूंना कल्याणकारी वस्तूंचे वाटप यांचा समावेश आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फलक चेन्नईत सर्वत्र झळकत आहेत. यंदा मात्र वाढदिवशी ते चेन्नईत आहेत. आवडत्या अभिनेत्याचे अभीष्टचिंतन करण्यासाठी चाहते त्यांच्या घरी भेट देण्याची शक्यता असल्याने परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. यासाठी पोलिस तैनात केले असून बॅरिकेड उभारण्यात आले आहेत.
वयाच्या २५ व्या वर्षी रजनीकांत यांना १९७५ मध्ये चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ‘अपूर्वा रागंगल’ असे या चित्रपटाचे नाव होते. त्यात त्यांची छोटी भूमिका होती. पण, होती ती रागीट नवर्याची भूमिका. हा चित्रपट कथानकामुळे वादग्रस्त ठरला. तीन पुरस्कार मिळाले. वृत्तपत्रामधून रजनीकांतच्या छोट्या पण, प्रभावी कामाचे खूप कौतुक झाले होते.१९८३ मध्ये त्यांनी ‘अंधा कानून’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.