मराठवाडा पदवीधर निवडणूकित पंकजा मुंडे समर्थकांची बंडखोरी; भरले उमेदवारी अर्ज

10

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपने शिरीष बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपा अन्य इच्छुकांचे समाधान करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले प्रवीण घुगे आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बंडखोरी करत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

मराठवाड्यातील दोन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचे बोललं जात आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण, वंचित बहुजन आघाडी कडून नागोराव पांचाळ तर, भाजपा कडून शिरीष बोराळकर यांना पक्षांनी अधिकृत उमेदवारी दिल्या आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची मोठी भाऊगर्दी होती. गेल्यावेळी शिरीष बोराळकर यांना पराभव पत्कराव लागला होता. त्यामुळे यंदा आम्हाला संधी द्या अशी बंडखोरांनी मागणी केली होती. आता भाजप नेतृत्व हे बंड कसे मोडून काढते हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.