टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक मुंबईत येतात. मुंबईत आल्यावर अनेकांची राहण्याची अडचण होते. टाटा रुग्णालयाच्या रस्त्यांवर, आजूबाजूच्या पुलाखाली रुग्णांचे नातेवाईक दिवस काढतात.
रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मुंबईत राहण्याची सोय व्हावी, या हेतूने गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपुर्वीच म्हाडाकडून जागा देऊ असे आश्वासन दिले होते. त्याची घोषणा आज त्यांनी पत्रकार परिषदेत केली. म्हाडाकडून टाटा रुग्णालयापासून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हाजी कासिम चाळ परिसरातील १०० सदनिका म्हाडाने टाटा रुग्णालयाला देऊ केल्या आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांना सदनिका देण्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये यासाठी ही जबाबदारी टाटा रुग्णालयाच्या प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या निर्णयामागे मुख्यमंत्री महोदयांचे मोठे योगदान असल्याचेही ना. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच सदनिकांच्या चावीचे वाटप हे कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेले आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या हस्ते करण्याचा आमचा विचार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री ना. जिंतेद्र आव्हाड यांनी दिली आहे.