कोरोनारुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात बिटको व जिल्हा सामान्य रुग्णालयाला काल मंत्री छगन भुजबळ यांनी भेट देवून पाहणी केली, तसेच आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आदी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयात एकूण 640 अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह आवश्यक वैद्यकीय सुविधांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वी 110 खाटांची क्षमता होती. तेथे आता 90 बेड वाढविल्याने 200 बेडची क्षमता झाली आहे. तसेच बिटको रुग्णालयात 300, तसेच नाशिकरोड येथील अग्निशमन दलाची इमारत व भक्तनिवास या कोविड केअर सेंटरमध्ये 250 असे एकूण 640 अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार आहे.
बिटको रुग्णालयात अत्याधुनिक दर्जाचे सिटी स्कॅन मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे मशिन लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार असून दिवसभरात दोनशे रुग्णांचे स्कॅनिंग होणार आहे. तसेच बिटकोमध्ये लवकरच प्रति दिवस पाच हजार स्वॅब तपासले जाणार आहे.