दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे धडाकेबाज राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे अंबानींचं ऐकतात म्हणून रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं होतं.
पण राज्यमंत्री कडू यांना नागपूर पोलिसांनी नागपुरात रोखून धरलं आहे. महत्वाचं म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती आहे.
नागपुरात बच्चू कडू थांबलेल्या विश्रामगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात आज सकाळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सकाळी 9 च्या विमानाने राज्यमंत्री बच्चू कडू मुंबईला रवाना होणार होते. पण पोलिसांनी त्यांना विश्रामगृहाच्या दारातच अडवून धरलं आहे. त्यामुळे मंत्री कडू मोर्चाला पोहचू शकतील का ? असा प्रश्न आहे.
नागपूर पोलिसांनी अडवल्यानंतर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून दुसऱ्या विमानाने मुंबईला रवाना होण्याबाबत विचारणार असल्याचं राज्यमंत्री कडू यांनी सांगितलं. आमच्या आंदोलनामुळे दिल्लीतील आंदोलनावर काही विपरीत परिणाम होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असावी, त्यामुळे आपल्याला इथं रोखलं गेलं असावं. असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय.