अन् राज्यमंत्री दत्तात्रय भरणे झाले तरुणांचे फोटोग्राफर..

35

कालपासून राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे विधान भवनाचा परिसर मंत्री, त्यांच्या गाड्यांच्या गर्दीने भरलेला असतो. या अधिवेशानाच्या पहिल्या दिवसानंतर एक अनोखी घटना विधानसभा भवनापासून काही अंतरावर असणाऱ्या मरीन ड्राइव्हवर घडली आहे. महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत एक प्रकार घडला. राज्यातील मंत्री सर्वसामान्य नागरिकांचे फोटो काढताना दिसले. कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांनी हा प्रसंग आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केला आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे मरिन ड्राइव्हवर वॉकसाठी गेले होते. काही तरूणांनी त्यांना त्यांचा फोटो काढण्याची विनंती केली. त्यापैकी एकानेही त्यांना ओळखले नव्हते. त्यांनी चक्क ‘ओ काका…. आमचा फोटो काढा ना’ असे म्हणत राज्यमंत्री भरणे यांच्या हातात कॅमेरा दिला. मग काय भरणे यांनी चप्पल बाजूला सरकवत सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे फोटो क्लिक केला. कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांनी हा प्रसंग आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिला आहे.

तरुणांनी राज्यमंत्र्याकडे ही विनंती केल्यावर काय झालं यासंदर्भात आशुतोष काळे यांनी पोस्ट लिहली आहे, “त्या मुलांनी फोटो काढण्यास सांगितल्यावर भरणे मामांनी लगेच त्या मुलांचा मोबाईल हातात घेऊन त्यांच्या ग्रुपचा फोटो काढला. त्यावेळी भरणे मुलांचा फोटो काढत असताना त्यांचा फोटो काढण्याचा मोह मलाही आवरला नाही. महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याचे मंत्रिपद सांभाळणाऱ्या भरणे यांचा साधेपणा मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. असे काळे यांनी व्यक्त केले आहे.