शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन दाखवल आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत ७७.२५% गुण घेऊन घवघवीत यश मिळवलं आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचा पदवीचा निकाल नुकताच जाहीर झाला. एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या सेंटर मधून पदवी परीक्षा दिली होती. त्यामधे ते चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. वयाच्या ५६ व्या वर्षी पदवी पास होणारे बहुदा ते पहिलेच मंत्री असतील.
सगळ्यांना आपल्या मनासारखं शिक्षण घेता येत नाही. श्रीकांत डॉक्टर झाला पण माझं शिक्षण अर्धवट राहिेलं होतं. शिक्षणविषयक तळमळ मनात होती. शिक्षणाविषयी मनात जिद्द होती. शिक्षणाचे महत्व मला माहित आहे. त्यामुळे पदवीधर व्हायचं असं मनात ठरवलं होतं असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकनाथ खडसे शिवाजी पार्कवर आले असता त्यांनी आपण पदवी उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली.