मिथुन चक्रवर्ती करणार भाजपमध्ये प्रवेश

56

बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.मिथुन चक्रवर्ती यांचा राजकारणातील रस ही नवी बाब नाहीये.त्यांनी यापूर्वी राज्यसभेची खासदारकी भूषवलेली आहे.

गेल्याच महिन्यात त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटले आहे की मिथुन चक्रवर्ती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकातामध्ये होणाऱ्या रोड शोला हजेरी लावणार आहेत. 

2014 साली मिथुन यांना तृणमूल काँग्रेसने राज्यसभेवर पाठवलं होतं. डिसेंबर 2016 पर्यंत ते खासदार होते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान 27 मार्चला होणार असून निकाल 2 मे रोजी लागणार आहे. 

मिथुन यांच्याव्यतिरिक्त बीसीसीआयचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली हा देखील भाजपमध्ये सामील होणार असल्याची जबरदस्त चर्चा आहे. रविवारी नरेंद्र मोदी यांच्या रोड शो आणि सभेच्या कार्यक्रमात त्याचाही पक्षप्रवेश असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपकडून मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी सांगितले की ‘जर मिथुन हे भाजपमध्ये आले तर ते बंगाल आणि भाजप दोन्हीसाठी चांगली गोष्ट असेल, जर त्यांनी पंतप्रधानांसोबत मंचावर हजेरी लावली तर बंगालमधील जनतेला आनंदच होईल’