आमदार बाळासाहेब सानप घेतायत पुन्हा भाजपचा झेंडा हाती

16

आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बाळासाहेब सानप दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

बाळासाहेब सानप यांना पक्षात ठेवण्यासाठी शिवसेनेनेही प्रयत्न केले. सानप यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना पक्षात संघटनात्मक जबाबदारी देण्याबरोबरच महामंडळाचे आश्वासन देण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.पालिका निवडणुका आल्याने आपल्याला महत्त्व दिलं जात असून निवडणुका गेल्यावर पुन्हा जैसे थे परिस्थितीला सामोरे जावं लागणार असल्याचं सानप ओळखून आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने हे तीन पक्ष एकत्र लढल्यास भाजपला मोठं नुकसान सोसावं लागणार आहे. त्याशिवाय नाशिकमध्ये मनसेची मोठी व्होटबँक असल्याने भाजपसाठी ती सुद्धा एक मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळेच भाजपने सानप यांना पक्षप्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत.मात्र दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्याच एका गटातून उपस्थित होत आहे.