आमदार रत्नाकर गुट्टे ‘या’ कारणासाठी करणार उद्यापासून बेमुदत उपोषण

7

परभणी गंगाखेड येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी गंगाखेड येथील आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे सोमवारी म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजल्यापासून परभणीत बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

गंगाखेडातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम वर्षानुवर्षापासून रेंगाऴले आहे. त्याचा परिणाम गंगाखेडातील बाजारपेठेवर होऊ लागला आहे. विशेषतः बसस्थानक परिसरातील व्यवहार ठप्प झाले आहेत.

या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय वाहतुक सुरळीत होणार नाही, असे स्पष्ट करीत आमदार गुट्टे यांनी मुळी बंधार्‍याचे रखडलेले कामही पूर्ण करावे,मतदार संघाअंतर्गत वीज जोडणीची मोहीम थांबवावी, 98 खेड्यांना मुख्य रस्त्याशी जोडणार्‍या प्रस्तावित रस्त्यांची कामे पूर्ण करावित.

टेलपर्यंत कालव्यांची दुरूस्ती करावी, धनगर टाकळी, पिंपळगाव, राणीसावरगाव ते लातूर जिल्हा रस्त्याचे काम पूर्ण करावे, यासह अन्य मागण्याही गुट्टे यांनी केल्या. प्रशासन जोपर्यंत दखल घेणार नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील, असा इशाराही आमदार गुट्टे यांनी दिला..