आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये युवकांशी संवाद

13

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्‍या ग्रामीण कार्यकारिणीतर्फे नाशिकमध्ये झालेल्‍या कार्यक्रमात युवकांनी विविध प्रश्‍नांच्‍या माध्यमातून रोहित पवार यांचा दृष्टिकोन जाणून घेतला.रविवारी (ता. २७) कॉलेज रोडवरील चाय टपरी येथे झालेल्‍या ‘कॉफी विथ दादा’ या उपक्रमात सहभागी होताना रोहित पवारांनी युवक-युवतींशी मनसोक्‍त गप्पा मारल्या.

राज्‍यात होणाऱ्या प्रत्‍येक गुन्ह्या‍ची नोंद पोलिसांकडून घेतली जात असल्‍याने, गुन्‍हेगारीत वाढ होत असल्‍याची चर्चा होते. परंतु अन्‍य राज्‍यांच्‍या तुलनेत महाराष्ट्रात महिला अधिक सुरक्षित आहेत. आगामी दोन महिन्‍यांत शक्‍ती कायदा मंजूर होणार असल्‍याने यातून महिलांना अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होईल, असा विश्र्वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. प्रत्‍येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचेही पवारांनी सांगितले.

राजकारणात यायचे असेल, तर युवकांनी महाविद्यालयातील शिपायांनादेखील आदर्श समजायला हवे. इतरांची नक्‍कल करण्यापेक्षा स्‍वतःची शैली विकसित करण्याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.या वेळी झालेल्‍या गर्दीमुळे आयोजकांना यासंदर्भात ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना द्यावी लागली. तरीदेखील युवकांचा जमाव ऐकत नसल्‍याने आमदार पवार यांनी संताप व्‍यक्‍त करत युवकांना सुनावले.उद्योगाच्‍या विकासासाठी युवकांनीच पुढाकार घ्यायला हवा. तसेच नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्याची आवश्‍यकता आमदार रोहित पवार यांनी व्‍यक्‍त केली.