कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचं आवाहन सरकार, प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी नियमांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) असाच एक प्रकार समोर आणला आहे.
मनसेचे नेते संतोष धुरींनी कमला मिल कंपाऊंडमधल्या युनियन पबमधून फेसबुक लाईव्ह केलं. पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं व्हिडीओत दिसत होतं. पबमध्ये कोणतंही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. यावरून धुरींनी मंत्री आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं.
मनसेचे नेते संतोष धुरींनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वरळीतील पबमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन सुरू असल्याचा प्रकार त्यांनी समोर आणला आहे.या माध्यमातून धुरींनी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचं सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे,’ असं धुरी म्हणाले.