औरंगाबाद नामांतराचा वाद चांगलाच पेटलेला आहे. औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. या मागणीला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दात काँग्रेसची भूमिका बोलून दाखवली होती.
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामांतर करायला कॉंग्रेसचा विरोध आहे, अशी भुमिका घेतली आहे. त्यावर जो छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करेल, त्यांना मनसे सोडणार नाही, असे नगरच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
औरंगाबादचे नाव बदलण्यास विरोध करणाऱ्या थोरात यांना मनसेच्या व जनतेच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ असे लिहिलेले जिल्ह्यातून जवळपास दहा हजार पोस्टकार्ड बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरच्या पत्यावर पाठवले जाणार आहेत. मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी ही माहिती दिली आहे