शिर्डीत मनसेच्या कार्यकर्त्यांवर वीज कार्यालयाची तोडफोड प्रकरणी गुन्हे दाखल

0

वाढीव वीज बिलांविरोधात मनसेकडून आज राज्यभरात आंदोलने करण्यात आली. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, सरकारचा आदेश झुगारून राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसले. यापैकी मुंबई आणि ठाण्यातील मोर्चामध्ये मनसेचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले होते.

प्राथमिक माहितीनुसार, पाच कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर आज सकाळी पोलिसांनी वीज कार्यालयातील तोडफोडीनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी वीज वितरणचा एक कर्मचारीही जखमी झाला होता.

मुंबईत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींच्या उपस्थितीत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सरकार जर गंभीर असेल तर दखल घेईल, जर गंभीर नसेल तर मनसेच्या भाषेत इथून पुढे सरकारला उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला. यावेळी आम्ही वीजबिल भरणार नाही. कोणी वीज कापण्यासाठी आलं तर त्याच्या कानाखाली शॉक काढू, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.