देशभरात आज कोरोना संसर्गाने आपलं डोकं पुन्हा एकदा वर काढलं आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्र सरकारच्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता जेष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपले परखड मत मांडून केंद्राकडून केल्या जाणाऱ्या उपाय-योजनांवर ताशोरे ओढले आहेत. ‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी आपले केंद्र सरकार विरोधात परखड मत मांडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणाचं फारसं महत्त्व वाटत नाही. मी हार्वडपेक्षा हार्डवर्कला प्राधान्य देतो, हे त्यांचे वक्तव्य बरंच काही स्पष्ट करणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोणत्याही तज्ज्ञ व्यक्तींची गरज वाटत नाही. आपण तज्ज्ञांपेक्षा मोठे आहोत, असा त्यांचा समज असावा. याचीच परिणती देशातील कोरोना परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात होत असल्याचे वक्तव्य रामचंद्र गुहा यांनी केले आहे.
तसेच यावेळी रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना परिस्थिती हाताळण्यात का अपयशी ठरले, याची तीन प्रमुख कारणे सांगितली. एक म्हणजे नरेंद्र मोदी यांना तज्ज्ञ आणि त्यांच्या अनुभवी सल्ल्याचे वावडे आहे. मुळात पंतप्रधान मोदींना शिक्षणाचं फारसं महत्त्व वाटत नाही असे मत गुहा यांनी मांडले आहे.
पंतप्रधान मोदी स्वत:च मला तज्ज्ञांची गरज नाही, असे सांगतात. आपण तज्ज्ञांपेक्षा मोठे आहोत, असे मोदींना वाटते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला हवा तसा सल्ला देणाऱ्याच तज्ज्ञांचा सल्ला घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीतरी भव्यदिव्य आणि नाट्यमय करण्याचा सोस टाळून देशातील आघाडीच्या साथरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार धोरण आखले असते तर भारतात कोरोनाचा प्रकोप बराच कमी असता. घरातील लाईट बंद करुन दिवे लावणे किंवा थाळ्या वाजवणे हा निव्वळ गवगवा आणि अंधश्रद्धेचा प्रकार असल्याची टीकाही यावेळी रामचंद्र गुहा यांनी केली.