‘मोदींनी लॉकडाऊन करतांना खात्यात पैसे टाकले नव्हते, राजकारणासाठी धारेवर धरणे योग्य नाही’ : राष्ट्रवादी

46

कोरोनाचा प्रसार रोखण्यासोबतच अर्थव्यवस्था ठप्प न करता निर्णय घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊनसंदर्भात बोलताना केला आहे.

तसेच भाजपचे नेते पॅकेजची मागणी करुन राजकारण करत आहेत ते योग्य नाही. मागील वर्षी पंतप्रधान मोदींनी जेव्हा लॉकडाऊन घोषित केले त्यावेळी त्यांनी कोणालाही विचारात घेतले नव्हते. याशिवाय त्यांनी कोणच्याही खात्यात पैसे टाकले नव्हते. फक्त राजकारणासाठी असे करा किंवा तसे करा? बोलणे योग्य नाही.

लोकांचे जीव वाचविण्यासाठी राज्याला जे करावे लागेल ते नक्कीच करण्यात येईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जिल्ह्यातील कामगार, गरिबांना दोन वेळचे जेवण देण्याचे काम तब्बल चार महिने महाराष्ट्राने केले होते.

जेव्हा मजूर पुन्हा त्यांच्या राज्यात गेले तेव्हा महाराष्ट्र जिंदाबादचे नारे त्यांनी दिले होते. आज गुजरातमध्ये रुग्णांसाठी रुग्णालयात जागा नाही. महाराष्ट्रात कोविड काळात जे काम झाले ते कोणत्याही राज्यात होत नाही, असा ठाम विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.