मोदी संविधान बदलणार नाहीत; खोडसाळ आरोप करू नयेत : रामदास आठवले

4

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान बदलणार आहेत. अशा वावड्या कायम चर्चेत उठतात. मोदींचे विरोधक मोदी संविधान बदलणार असल्याची भीती व्यक्त करत असतात. मात्र, आता नरेंद्र मोदी यांच्याच मंत्रिमंडळात सहभागी असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिलं आहे.

आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान मानणारे, पूजणारे आहेत. त्यांनी 2019 च्या निवडणुकी नंतर, त्यांची संसदेत नेता म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम संविधानाला अभिवादन केले होते. त्यामुळे संविधान ते बदलणार असा खोडसाळ आरोप कोणी करू नये, असा इशाराच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांना दिला आहे.

रामदास आठवले यांनी काल आपल्या बांद्रा येथील संविधान निवासस्थानी 71 संविधान ग्रंथाचे वाटप केले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातुन वेळोवेळी कायदे निर्माण करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. त्यामुळे संविधान कोणी बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं देखील रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.