पंकजा मुंडेंना ‘या’ खासदाराने दिलं शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण

1

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे ह्या पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्या पक्ष बदलतील अशा वावड्या उठवल्या जात असतात. त्याचबरोबर अनेक नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना आता शिवसेना खासदाराने शिवसेना प्रवेशाच निमंत्रण दिलं आहे. शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पंकजांना सेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. हेमंत पाटलांसह शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पंकजांना सेनेत बोलवण्यासाठी विनंती करणार आहेत. 

“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये मान मिळत नाही. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्यास त्यांचं स्वागतच आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत आणण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्यास मराठवाड्यात शिवसेनेला बळ मिळेल.” असा विश्वास हेमंत पाटील यांनी मराठी वृत्तवाहिनी ‘टीव्ही 9 मराठी’ शी बोलताना व्यक्त केला.