राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण, खासदार उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटलांची दिल्लीत भेट

24

साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले व शशीकांत शिंदेंत वादाची ठिणगी पडलेली असतानाच सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाल्याची महिती मिळत आहे. शुक्रवारी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये यांची भेट झाली आहे. विशेष म्हणजे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा पराभव केल्यानंतर झालेली ही पहिली भेट आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र, सातारा जिल्ह्यातील प्रश्नांसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामुहिकरित्या संसदेत प्रयत्न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उदयनराजे निवडणूकीतील वैरत्व विसरून श्रीनिवास पाटील यांना महाराष्ट्र सदनात भेटले व दोघांत विविध विषयांवर चर्चा देखील झाली.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट झाली. या भेटीत सातारा जिल्ह्याची विविध विकासकामे व प्रश्न संसदेत मांडून पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.