आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला टीम इंडियाचा माझी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी रांचीमध्ये झाबुआच्या कडकनाथ कोंबड्याचा व्यवसाय करणार असल्याची माहिती आहे. या व्यवसायाशी धोनीने मध्य प्रदेशमधून झाबुआच्या कडकनाथ कोंबड्यांच्या 2 हजार पिल्लांची ऑर्डर सुद्धा दिली आहे. त्याचबरोबर धोनीने झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्यांना याचं पेमेंटही दिलं आहे. धोनी लवकरच रांचीमध्ये मध्यप्रदेशमधील झाबुआचे कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय करतांना दिसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने सेंद्रीय शेती आणि कडकनाथ कोंबड्यांचं कुकुटपालन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुकुटपालनासाठी धोनीने रांचीमधील व्हेटरनरी कॉलेजमधील प्राध्यापक मित्राच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधून झाबुआचे आदिवासी शेतकरी विनोद मेडा यांच्याकडून 2 हजार कडकनाथ कोंबड्यांच्या पिल्लांची ऑर्डर दिली आहे. याची डिलिव्हरी 15 डिसेंबरपर्यंत होणार आहे. धोनीने दिलेली ही ऑर्डर मिळाल्याने झाबुआचे आदिवासी शेतकरी विनोद मेडा आनंदी आहेत. जेव्हा या कडकनाथ पिल्लांची डिलिव्हरी करायला रांचीला जाऊ तेव्हा धोनीची देखील भेट होईल, अशी आशा विनोद मेडा यांना आहे.