भालकी जि.बिदर येथील एका युवकाचा येथील बिदर रेल्वे उड्डाणपुलाखाली शनिवारी पहाटे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कमरेच्या बेल्टने मारहाण झाल्याने या इसमाचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास पायी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना एक युवक मृत अवस्थेत पुलाखाली पडचे आढळून आले.
त्यानंतर काही नागरिकांनी ग्रामीण पोलिसांना फोनवर या घटनेची माहिती दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक घारगे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या मयताची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला.
या भागातील सीसीटीवी फुटेज तपासल्यानंतर उमेश मुरलीधर उखंडे वय-४०रा सोनार गल्ली, भालकी कर्नाटक या इसमाचा खून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आधारे घटनास्थळाच्या शेजारील लॉजचा कर्मचारी युवराज पाटील यास ताब्यात घेतले आहे.
या मयताचे प्रेत येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी बीट अंमलदार श्री रंगवाळ, डीबी पथकाचे नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे, तुळशीदास बरूरे, राहुल गायकवाड आदींनी पुढाकार घेतला आहे.