नाना पटोलेंचा विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा

13

गेल्या दोन दिवसांपासून नाना पटोले राजिनामा देणार अशा चर्चा रंगत होत्या. नाना पटोले यांनी पदाचा राजिनामा देत यावर शिक्कामोर्तब केले आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. बुधवारी त्यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. आज सकाळी ते महाराष्ट्रात परतले.

नाना पटोले यांनी राजकारणाची सुरुवात कॉंग्रेस पक्षातून केली. भंडारा गोंदिया परिसरात कृषी क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. २०१९ साली पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली व महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

नाना पटोले आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पण विधानसभा अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये बदल करत सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र घेऊन, विधानसभेचे कामकाज चालवले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.