नंदकुमार राजमल्ले यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूर ध. केंद्र बाळापूर ता. धर्माबाद जि. नांदेड येथील उपक्रमशील शिक्षक नंदकुमार राजमल्ले यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा नांदेड यांचेकडून लॉकडाऊन काळात मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिल्याबद्दल गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून नांदेडच्या कुसुम सभागृहात उद्या सायंकाळी सहा वाजता समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, नांदेड मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य संघटक नागभूषण दुर्गम यांनी कळविले आहे.

सन 2016 मध्ये नंदकुमार राजमल्ले हे रामपूर येथील शाळेवर रुजू झाले. तत्कालीन मुख्याध्यापक श्री तुळशीराम सिरमलवार आणि सध्याचे मुख्याध्यापक श्री नागेश वरगंटवार यांच्या नियंत्रणाखाली, केंद्रप्रमुख श्री संतुकराव आंदेलवाड, माजी केंद्रीय मुख्याध्यापक सलीम शेख आणि सध्याचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री संतोष नाईक तसेच माजी गटशिक्षणाधिकारी डॉ. डी. एस. मठपती आणि सध्याचे श्री एल. एन. गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी येथील शाळेत अनेक उपक्रम राबविले आणि ते यशस्वी देखील केले. तत्पूर्वी बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील शाळेत देखील त्यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय असेच होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले होते. त्यांच्या कार्यकाळात सदरील शाळा नावारूपास आली होती अशी आठवण त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.

रामपूर ध. येथील शाळा पहिली ते चौथी अशी चार वर्गाची असून 30 ते 35 विद्यार्थी येथे अध्ययन करतात. नंदकुमार राजमल्ले यांनी सर्व मुलांना वाचन करता यावे यासाठी भरपूर मेहनत घेतली. कारण वाचन करता आले की विद्यार्थ्यांच्या पुढील समस्या आपोआप संपुष्टात येतात. त्यांच्या प्रयत्नामुळे येथील सर्वच्या सर्व विद्यार्थी अस्खलित वाचन करतात तसेच 100 टक्के प्रगत शाळा म्हणून त्याचा यापूर्वी गौरव झाला आहे. सुट्टीच्या काळात मुलांना विविध छंद जोपासता यावे म्हणून त्यांनी ” अशी घालवू या सुट्टी ” हा पंधरा दिवसाचा सुट्टीच्या काळात शिबिराचे आयोजन केले होते. ज्याची जिल्हा स्तरावर देखील वाहवा करण्यात आली. तसेच या उपक्रमास नाविन्यपूर्ण नवोपक्रम स्पर्धेत पारितोषिक देखील प्राप्त झाले आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद होत्या. प्राथमिक वर्गातील मुले शिक्षण प्रवाहाच्या बाहेर जाऊ नये यासाठी त्यांनी शाळा सुरू होण्यापूर्वीच म्हणजे मे महिन्यात ” घरातूनच शाळा व सुपर संडे ” हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. जे की आजतागायत चालू आहे. रोज सकाळी सहा वाजता एक हजार विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ते रोजचा अभ्यास टाकतात. नुकतेच त्यांची 200 क्रमांकाची पोस्ट टाकण्यात आली होती. सातत्यपणा आणि नियमितपणा या दोन गोष्टीमुळे त्यांच्या या उपक्रमाची नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा. प्रशांत दिग्रसकर साहेब यांनी दखल घेतली आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

प्रेरणेमुळे मनुष्य अधिक जोमाने कामाला लागतो तर पुरस्काराने त्या केलेल्या कामाला पावती मिळते. आज त्यांना गुणवंत पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाल्यावर त्यांचे शिक्षकमित्र स्तंभलेखक नासा येवतीकर, मुख्याध्यापक साईनाथ सायबलू, उदयकुमार शिल्लारे, सर्पमित्र क्रांती बुद्धेवार, किरण रणवीरकर, साई पाटील आणि शंकर गंडरोड यांनी त्यांचे अभिनंदन करून स्वागत केले आहे. अगदी योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा नांदेड यांचे सर्व शिक्षकमित्रांनी आभार व्यक्त केले.