राष्ट्रवादी तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २ कोटीचा धनादेश सुपूर्त !

26


मुंबई :
सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट बनत चालली आहे. त्यात मोफत लसीकरची घोषणा केल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व आमदारांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते, आता त्या पाठोपाठ राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे १ कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एका महिन्याचे वेतन असे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे ट्रस्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.


आज महाराष्ट्र राज्य गेल्या वर्षभरापासून यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आपदेला तोंड देत आहे. राज्यातील जनता व प्रशासन या आपदेसोबत जोमाने लढत असले तरी एकूणच जगभरचा आर्थिक विकास मंदावला असल्याने राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे. तसेच राज्यातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला असल्याने राज्याच्या तिजोरीवर आधीपेक्षा अधिक भार पडणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध आहे. म्हणूनच कोरोना सोबत लढण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आव्हानही करण्यात आलेले आहे.