अशोक चव्हाण यांच्या राजकीय विरोधकांची मोट बांधत नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होतोय

141

लोकसभेच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये डेरेदाखल झाले. नांदेड जिल्ह्यात भाजप मजबूत झाली असे वरवरून वाटत असले तरी अशोक चव्हाण यांच्या येण्याने अशोकराव चव्हान यांचे पारंपरिक विरोधक, आधीचे भाजपचे नेते आणि त्यांच्या कार्यशैलीला कंटाळून भाजपमध्ये आलेले नेते नाराज झाले होते. जिल्ह्यात कॉंग्रेस संपेल अशी चर्चा सुरू असतानाच नवखे वसंतराव चव्हाण यांनी तत्कालीन विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला. चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये राजकीय सौख्य नव्हते हे वेगळे सांगायची गरज नाही.

चिखलीकरांच्या पराभवामुळे अशोक चव्हाण यांना भाजपामध्ये घेवून काहीही फायदा झाला नाही अशा चर्चा झाल्या. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचे समर्थक आजी माजी आमदार भाजप मध्ये येतील असे वाटत असताना लोकसभेच्या निवडणुकीवेळी कोणीही त्यांच्या सोबत आले नाही उलट जिल्ह्यात कॉंग्रेस मजबुतीसाठी लढत राहिले त्यात प्रामुख्याने तत्कालीन आमदार मोहनराव हंबर्डे, माधव पाटील जवळगावकर, माजी आमदार बेटमोगरेकर इत्यादि होते. आपल्या स्नुषा मीनल पाटील खतगावकर यांना लोकसभेची भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते पण त्यांना उमेदवारी काय मिळाली नाही. निदान नायगाव विधानसभेची तरी उमेदवारी मिळाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती ती पण भंग झाल्यामुळे भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या स्नुषा, माजी आमदार ओप्रकाश पोकर्णा इत्यादी पुन्हा कॉंग्रेसमध्ये माघारी गेले होते.

देगलूर विधानसभा मतदारसंघाचे मागच्या निवडणुकीचे भाजपचे उमेदवार सुभाष साबने भाजच्या उमेदवारीसाठी आग्रही होते पण ऐन विधानसभेच्या तोंडावर अशोक चव्हाणांचे समर्थक कॉंग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेवून चव्हाणांच्या आशीर्वादाने देगलूरची भाजपची उमेदवारी मिळवली. सुभाष साबने यांनी अपक्ष लढवण्यासाठी भाजप सोडली, माजी आमदार अविनाश घाटेही देगलूर मधून इछुक होते. त्यांचाही हीरमोड झाला.

लोकसभेत पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर साईडलाइन झाल्यासारखे वाटत असल्यामुळे विधानसभेची संधि हेरून प्रतापपाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित दादा यांच्या सोबत जावून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवून निवडून आले.

मुखेड मतदारसंघात महायुतीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर इच्छुक होते त्यांनी जोरदार तयारी केली बालाजी पाटील यांच्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापति, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी विद्यमान भाजप आमदार तालुक्यातील पारंपरिक राजकीय विरोधक डॉ तुषार राठोड यांच्या विरोधात जोरदार काम केलं. महायुतीत मुखेडची जागा विद्यमान आमदार असल्यामुळे भाजपला गेली आणि भाजपने डॉ तुषार राठोड यांना उमेदवारी दिली. पक्षाच्या विरोधात काम करून पक्षशिस्त भंग केल्याच्या कारणावरून गोजेगावकर पाटील यांच्यावर भाजपने कारवाई केली होती.

त्यानंतर आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुखेडचे माजी आमदार श्री. अविनाश घाटे, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. अ‍ॅड. संदीप पाटील चिखलीकर यांच्यासह नांदेड शिवसेना उबाठा गटातील जिल्हाप्रमुख श्री. माधव पावडे, तालुकाप्रमुख श्री. गणेश शिंदे, जिल्हा संघटक श्री. नेताजीराव भोसले, महानगरप्रमुख श्री. पप्पू जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. बालाजी शिंदे, युवती सेना जिल्हाप्रमुख श्रीमती. रोहिणी कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य श्री. साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्री. संतोष पावडे, युवासेना शहर प्रमुख श्री. अभिजीत भालके, ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्री. योगेश संभाजी शिंदे, दर्यापूरचे सरपंच श्री. विलास सूर्यवंशी तसंच भोकरचे श्री. दादाराव ढगे आदी नेत्यांनी उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसथितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यात मजबुतीच्या दिशेने आगेकूच केली आहे अशी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.