विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. पदवीधर मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेंबांधणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडून अखेरच्या दिवशी औरंगाबादमधून सतीश चव्हाण यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पुण्यातून अरुण लाड यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर अखेरच्या क्षणाला राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नाव निश्चित करण्यात आली आहेत.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत सतीश चव्हाण आणि भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी शिरीश बोराळकर यांचा सतीश चव्हाण यांनी पराभव केला होता. सहा वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे भाजपकडून बोराळकर यांनाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांच्यात लढत पाहण्यास मिळणार आहे.