“राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकदा साथ देतील आणि सरकार येईल, अशी आशा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आहे, म्हणूनच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतात” असं वक्तव्य रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.
काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला. आगामी काळातील निवडणुकीत राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकदीने उतरणार असल्याचं आठवले यांनी जाहीर केलं.
“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आदरच आहे. कारण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एका बाजूला आणि राष्ट्रवादी- शिवसेना दुसऱ्या बाजूला आहेत. या भांडणात काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेईल, सोनिया गांधी कधी सूचना देतील, सांगता येत नाही. आणि काँग्रेसने पाठिंबा काढला रे काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत” असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला.