राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे एक मागणी केली आहे. तीन वर्षांपूर्वी भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव व जळगाव या चार तालुक्यांमध्ये शालेय पोषण आहारात झालेल्या अपहाराबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची मागणी आहे.
भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव व जळगाव या चार तालुक्यांमध्ये जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत धान्य व तांदूळ वाटपात अधिकाऱ्यांनी ठेकेदाराना हाताशी धरून भ्रष्टाचार केलेला आहे. या प्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीनेही कुठल्याही नोंदी नोदविलेल्या नाहीत.
या सर्व प्रकरणामध्ये पावत्यांवर योग्य ती दुरूस्ती न करता पुरवठादारास फायदा पोहचविण्यास कारणीभूत ठरणारे मुख्याध्यापक दोषी आहेत. असे असतांना जिल्हा परिषदेच्या सीईओंनी पुरवठादाराला वाचविण्यासाठी या प्रकरणातील सर्वांनी क्लीन चीट दिली आहे. तरी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी पत्राद्वारे वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.