पडळकरांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हल्लाबोल!

20

भाजपचे नेते गोपीचंड पडळकर यांच्या एका कृत्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते त्यांच्या चांगलेच संतापले आहे. गोपीचंड पडळकर हे कायम वादाच्या भोवर्‍यात अडकत असतात. जेजुरी गडावरील मुख्य मार्गाच्या पायर्‍यावर अहिल्यादेवी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनवारण होणार होते. मात्र गोपीचंड पडळकर यांनी त्याठिकाणी अगोदरच पोहचून स्मारकाचे अनावरण केले आणि यावेळी शरद पवार यांच्यावर टीका केली. या कृतीवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्यांनी पडळकरांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकरांना टोला लगावला आहे. ज्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची एवढी नोंद घेण्याची गरज नाही?,’ पडळकरांना जनतेचा पाठिंबा आहे का?भाजपासारख्या प्रमुख पक्षाचं तिकीट मिळूनसुद्धा पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त झालंय. त्यांच्यावर काय प्रश्न विचारता? लोकांनीच ज्यांना नाकारलंय त्यांना इतकं महत्त्व देण्याचं कारण नाही,’ असे अजित पवार यावेळी म्हणाले. पडळकर म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असेसुद्धा पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना थेट आव्हानच दिले आहे. “ऊद्या पवारसाहेब जेजुरीत येतायत, हिम्मत असेल तर आडवे येऊन दाखवा” असे आव्हाड यावेळी म्हणाले. तसेच “पवार साहेबांवर टीका केली म्हणजे हेडलाईन होते हे महाराष्ट्राला माहितीये, पडळकरांनासुद्धा ही कला ऊमजलीय. पडळकरांनी पहाटेच्या अंधारत जाऊन स्मारकाचे अनावरण केले, हिम्मत होतीच तर दुपारी करायचे असतेना, तिथं तुम्हाला कुणी ऊभंसुद्धा केल नसतं” असेसुद्धा आव्हाड यावेळी म्हणाले.

जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीसुद्धा पडळकरांचा समाचार घेतला आहे. ‘आततायीपणा किती करायचा याला काही मर्यादा असते. पण मर्यादेचा भंग करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचे? पडळकरांचे हे कृत्य अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणे आहे.” असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त ते जळगाव दौर्‍यावर आहे. तेथे ते बोलत होते.

जेजुरी गडावर जाणार्‍या मुख्य मार्गाच्या पायर्‍यांवर अहिल्यादेवींचा पुर्णाकृती पुतळा जेजूरी संस्थानच्याबतीने निर्माण करण्यात आला. शरद पवार यांना या पुतळ्याच्या अनावरणास बोलावले होते. मात्र पडळकरांनी त्याअगोदरच तेथे पोहचून पुतळ्याचे अनावरण केले. शरद पवार हे वाईट प्रवृत्तीचे आणि भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे त्याचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्यास लागू द्यायचे नव्हते असे पडळकर यावेळी म्हणाले होते. त्यानंतर मात्र चांगलेच राजकारण तापले होते.